✒ K. Satish
Wednesday, October 27, 2021
अयोग्य मदत
Friday, October 22, 2021
विचारांची गुणवत्ता
आणि
आपल्या विचारांची गुणवत्ता आपल्या संपर्कातील लोकांवर अवलंबून असते.
म्हणून नेहमी उत्तम विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा व आपल्या विचारांच्या गुणवत्तेची उंची वाढवा...
असे करून तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनस्वास्थ्याबरोबरच समाजस्वास्थ्यदेखील सुखमय व आनंदी बनवू शकता....
✒ K. Satish
Tuesday, October 12, 2021
गौरव कलेचा
कला क्षेत्रात आपल्या कलेच्या माध्यमातून नावाजलेले अतिशय गुणी कलावंत, अनुभवसंपन्न ढोलकीवादक व आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या आमच्या ( S K Music ) तिरडीवर जात्यालं लाकडं, याड लावलंय, सखू, भिमरावं पहिलाचं शोभला या कर्णमधुर गाण्यांच्या संगीतात मोलाचे योगदान असलेले असे आमचे मावस बंधू श्री. नितीन प्रधान यांच्या कलाजीवनातील प्रवास उलगडून दाखवणारा लेख बीड राज्यकर्ता या साप्ताहिकामध्ये काल दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध झाला. वाचून अतिशय आनंद झाला.
त्यांचा हा कलाप्रवास असाच अविरत सुरू रहावा व कलेची उपासना करताना त्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने अनेक नवीन कलावंतांना स्वतःमधील कलेचा विस्तार करण्यास उभारी येवो हीच मनःपूर्वक सदिच्छा...!!! 🙏🏻
त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
त्यांची ही कारकीर्द आमच्यासाठी खरोखरच खूप अभिमानास्पद आहे...!!!
त्यांच्या या कलाप्रवासाला सर्व कलाक्षेत्राकडून मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 🙏🏻
Wednesday, October 6, 2021
Wednesday, September 29, 2021
श्रेष्ठ दान
जो मनुष्य सुदृढ आहे त्याने जसे जमेल तसे रक्तदान अवश्य करावेत.
कोरोनाच्या दुष्टचक्राने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खूप दिवसांनंतर टाटा मोटर्स, कार प्लान्ट, पुणे येथे आज २९ सप्टेंबर २०२१ रोजी रक्तदान करण्याचा योग आला. खूप समाधान वाटले.
Sunday, September 26, 2021
बदल घडत नाही, घडवावा लागतो...
आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.असाच अहंकार शाळा, काॅलेज निवडण्याच्या बाबतीत सुरू झालाय. माझा मुलगा, माझी मुलगी अमूक शाळेत, अमूक काॅलेजला आहे हे पालकवर्ग अतिशय अभिमानाने सांगताना दिसतात. मोठी मोठी नावे सांगताना, त्या संस्थेची ख्याती सांगताना पालकवर्ग थकत नाही. कारण हा त्यांनी घेतलेला निर्णय असतो. आणि आपण घेतलेला निर्णय इतरांसमोर वाईट किंवा चुकीचा ठरणे हा पालकांना आपला अपमान झाल्यासारखे वाटते. म्हणून ही केविलवाणी धडपड.
परंतु या सर्व खटाटोपात पालक हेच विसरून चाललेत की, काही बोटावर मोजण्याइतक्या शिक्षणसंस्था सोडल्या तर सर्व शिक्षणसंस्थांचे कामकाज हे शेअर मार्केटमधील दुय्यम दर्जाच्या बनावट कंपन्यांसारखे झाले आहे. आपल्या शाळेचा भाव वाढवण्यासाठी खोटे चित्र निर्माण करून मोठमोठ्या बढाया मारणे, पालकांना मोठी स्वप्न दाखवणे, एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला कशाचेतरी आमिष देऊन त्याच्याद्वारेही शाळेची बनावट प्रसिद्धी करणे, विविध ॲक्टीव्हीटीजचे प्रेझेंटेशन करून आम्ही किती प्रमाणात मुलांना घडवण्यासाठी कार्यरत असणार आहोत हे दाखवले जाते. महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात यातील १० ते २० टक्केच चित्र खरे असते बाकी सर्व दिखावा. तुम्ही त्यांच्यासाठी फक्त पैसे छापण्याचे एक साधन असता. आणि या भ्रमातून जागे होईपर्यंत तुमचा आणि तुमच्या पाल्याचा आयुष्यातील कधीही परत मिळू न शकणारा बहुमूल्य वेळ वाया गेलेला असतो.
नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् ,
नष्टा विद्या लभ्यतेऽभ्यासयुक्ता ।
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ।।
खूप कष्ट करून गेलेली संपत्ती मिळवता येते.
विसरल्यामुळे गेलेली विद्या अभ्यास करून पुन्हा मिळवता येते. बिघडलेली तब्येत चांगले उपचार करून ती सुधारता येते. पण वेळ वाया घालवला तर तो गेला तो गेलाच.
म्हणून वेळेचं नुकसान कधीही भरून काढता येत नसल्याने वेळीच भ्रमातून जागे होऊन आपली खोटी फुशारकी मारणे थांबवायला हवे.
आपला पाल्य ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेतोय त्या संस्थेचे गुणगान नक्कीच गावे परंतु संस्थेने निर्माण केलेल्या भ्रमाला पाहून, त्यांच्या दिखाव्याला भाळून नाही तर त्यांचे कामकाज प्रामाणिकपणे मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी होते आहे का ?, फक्त पैशाच्या बाजारात गुरफटून संस्था आपल्या नीतिमूल्यांना आणि मुलांचे भवितव्य घडवण्यासारख्या महान कार्याच्या मूळ उद्दिष्टाला मूठमाती तर देत नाहीये ना ? या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून.
आज एखाद्या निवासी सैनिकी शाळेत मुलांना दाखल केल्यानंतर पालक निर्धास्त राहून आता आपल्या पाल्याचा अगदी उत्तमप्रकारे सर्वांगीण विकास होणार या भ्रमात जगत राहतात. अनेकांना तर आपले काम पैसे भरणे एवढेच राहिले आहे असे वाटू लागते. बहुतांशी निवासी शाळा या त्यांच्या भरमसाठ फी स्ट्रक्चरच्या अनुषंगाने पालकांची आर्थिक कुवत पाहूनच विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश निश्चित करतात. परंतु, फक्त फी भरून आपल्याच विश्वात रममाण होण्याचे व शालेय संस्थांच्या खोट्या आश्वासनांना भुलून स्वतःचे मानसिक समाधान करून घेण्याचे धोरण पालकांनी अवलंबिल्यास ते त्यांच्याबरोबरच त्यांच्या पाल्याच्या, इतर विद्यार्थ्यांच्या व इतर पालकांच्याही नुकसानास कारणीभूत ठरू शकतात.
वेळीच पालकांनी भ्रमातून जागे होऊन शालेय संस्थेच्या कार्यपद्धतीविषयी, मुलांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी, निवासी सैनिकी शाळा असल्यास त्यांच्या सैनिकी प्रशिक्षणाविषयी शालेय व्यवस्थापनाने वरवर दाखवलेल्या सुंदर चित्राला न भुलता वेळोवेळी गांभीर्याने पाठपुरावा करून शाळा व्यवस्थापनाचे काही चुकत असेल तर वेळीच निदर्शनास आणायला हवे. व त्यावर योग्य निर्णय वेळीच घ्यायला हवा.
कोणतीही संस्था असो वा व्यक्ती तो आपली जमेची बाजूच समोर मांडत असतो, आपल्या कार्याचे कौतुकच सांगत असतो. आपल्या चुकीचे प्रदर्शन मांडत नाही. कारण हा सर्व आता पैशाचा खेळ होऊन बसलाय.
आज आपण पैसे भरूनही मुलांच्या अधोगतीस हातभार लावतोय अशीच अनेक पालकांची अवस्था झालीय. पालकांचा हा भ्रम वेळीच तुटला नाही तर हळूहळू वेळ पुढे निघून जाते व आहे ती परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पालकांना पर्यायच उरत नाही. पण या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ वाया जाऊन कधीही न भरणारे नुकसान होऊन जाते.
हे सर्व सुधारावयाचे असेल तर प्रत्येक पालकाने शालेय प्रशासनाकडून मांडल्या जाणाऱ्या भ्रमित व दिशाभूल करणार्या चित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवणे थांबवायला हवे. आणि शालेय प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा वेळोवेळी एक सुजाण पालक ( फक्त पैसे भरणारी मशीन नव्हे ) म्हणून पाठपुरावा करून शाळेने दिलेल्या आश्वासनांची खरंच पूर्तता होत आहे ना याची योग्यप्रकारे खातरजमा करायला हवी.
लक्षात ठेवा, कोणतीही संस्था अगदी योग्यपद्धतीनेच काम करत असेल असे समजणे साफ चुकीचे आहे. आणि त्यांना वेळीच चुकीच्या कार्यपद्धतीविषयी जाब विचारला नाही तर त्यांचेही चुकीचे कामकाज करण्याचे धाडस वाढत जाऊन हळूहळू तिथे कर्तव्य विसरून पैसे छापण्याचा घाणेरडा खेळ सुरू होतो. आणि मग या खेळातून निर्माण झालेला भ्रष्टाचाररूपी राक्षस पालकांचे पैसे व विद्यार्थ्यांमधील विविध गुणांसोबतच त्यांच्या भवितव्यालाही गिळंकृत करून टाकतो.
म्हणून सर्वांनी वेळीच जागे व्हा व आपल्या योग्य हक्कांसाठी प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासा. मग समोर शालेय संस्था असली तरी डगमगू नये. कारण चुकीची कृती ही आपल्या प्रिय व्यक्तीकडूनही होऊ शकते. म्हणून काय आपण त्याला जाब न विचारता चुका करण्यासाठी प्रोत्साहन देतो का ?
बलात्कार करणे, लूटमार करून खून करणे हे अक्षम्य गुन्हे आहेत. अशा गुन्हेगारांना शासन करण्यासाठी लढणे ही खूप प्रशंसनीय गोष्ट आहे. परंतु हाच अपराध आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झाल्यास त्याला जाब न विचारता त्याच्या या कृतीचे समर्थन करून त्याला पाठीशी घालणे ही अतिशय चुकीची भूमिका असे मी मानतो.
मग शाळेसारख्या वंदनीय संस्थेकडून चुकीची कार्यपद्धती अवलंबली जात असेल तर पालकांनी त्या चुका सुधारण्याची मागणी करायला का घाबरावे. बदल एका दिवसात घडत नाही हे मान्य. परंतु योग्य - अयोग्याची जाण ठेवून स्वतःच्या हक्कांसाठी प्रश्नच उपस्थित केले नाहीत तर बदल कधीच घडणार नाही...
बघा विचार करून.......🙏🏻
Friday, September 24, 2021
लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
आत्ताच्या काळात क्रांतिकारी विचाराच्या व्यक्तीने मानसिक व वैचारिकरित्या मृत पावलेल्या स्वयंकेंद्रित लोकांचे प्रतिनिधित्व करून अन्यायाविरूद्ध लढणे म्हणजे आपल्या क्रांतीकारी विचारांचा, स्वाभिमानी बाण्याचा व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या वृत्तीचा स्वतःच्याच हाताने खून केल्यासारखे आहे.
कारण सध्याच्या काळात लोकांना आपल्या महापुरुषांच्या व क्रांतिकारकांच्या महान कार्याची प्रकर्षाने आठवण येते. अगदी अभिमानाने ते त्यांच्या कार्याचे गोडवे गात असतात. हे महापुरूष, क्रांतिकारक पुन्हा जन्माला यावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असते. परंतु या महान व्यक्तींचा त्याग, संघर्ष आणि बलिदान पाहता त्यांचा जन्म आपल्या घरात न होता इतरांच्या घरात व्हावा व पुन्हा त्यांनी स्वतःचे बलिदान देऊन इतरांना त्यांचे हक्क, अधिकार, न्याय घरबसल्या मिळवून द्यावेत अशी काहीशी सर्वांची मानसिकता झाली आहे.
त्यामुळेच मी हा प्रश्न मांडत आहे.....लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
खरंच, लढा कुणाच्या हक्कांसाठी ?
कारण क्रांतिकारक व महापुरूष पुन्हा पुन्हा जन्माला येणार नाहीत. त्यामुळे स्वतःच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी, न्यायासाठी प्रत्येकामध्ये लढण्याची वृत्ती आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण इतर कोणीतरी स्वतःच्या सुखांचा त्याग करून, स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला घरबसल्या आपल्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्याची प्रतिक्षा करत राहिलात तर तुम्ही आत्ता अनुभवत असलेली स्वतःची स्वयंकेंद्रित आरामदायी जीवनशैली संपुष्टात येऊन तुम्ही कधी पूर्णपणे गुलामगिरीत ढकलले जाताल हे तुम्हाला पूर्णपणे गुलाम होईपर्यंत कळणारदेखील नाही.
नीट विचार करा.....
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अडचणींचा तो विशाल डोंगर अदम्य जिद्दीने करूनी पार, शिक्षित करूनी स्त्री जातीला केला अज्ञानावरी वार स्त्री शिक्...
-
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी को...
-
मानवप्रजाती पृथ्वीतलावरी असे अति बलशाली हो, तरीही त्याला हतबल करीतसे नैसर्गिक कार्यप्रणाली हो प्रगतीपथावर गेलो जरी तरी ठाव न लागे निसर्गाचा,...
-
एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्च...
-
नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही ...
कर्तृत्व
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...


