Sunday, July 19, 2026
हुकूमशाहीचे सांगाडे
Tuesday, March 17, 2026
लोकशाहीचा आधारस्तंभ व लोकशाही टिकवून ठेवणारे खरे योद्धे
देशहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, सरकारच्या चुकीच्या कार्यप्रणालीवर निर्भीडपणे जाब विचारणाऱ्या स्वाभिमानी लेखणीला आणि प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेला संपवण्याचे, तिची गळचेपी करून लोकशाहीच्या नावाखाली अदृश्य अशी भयानक हुकूमशाही सुरू ठेवण्याचे षडयंत्र सुरू झालेले आहे. जे कधीच सर्वसाधारण सामान्य जनतेला न्याय, हक्क व चांगली जीवनशैली प्रदान करू शकत नाही.
भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी पूरक खत म्हणून लाचार, विकल्या गेलेल्या लेखण्यांचा सुळसुळाट या सरकारच्या काळात विपुल प्रमाणात झालेला आहे. अशा पैशाने विकल्या गेलेल्या लोकांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्याऐवजी राज्यकर्त्यांचे अधिकृत चापलूस बनून राहणे योग्य ठरेल.
कारण पत्रकारिता हे फक्त पैसे कमावण्याचे साधन नसून तो एक क्रांतीचा आवाज आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याचा, दबल्या-पिचलेल्या गरीब जनतेच्या हक्कांचा एल्गार आहे, देशाची अखंडता, सार्वभौमत्व टिकवून जनतेच्या प्रत्येक पैशाचे नियोजन सरकारमधील जनतेचे सेवक असलेले राजकारणी आणि अधिकारी नीट प्रामाणिकपणे करत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवून ते चुकत असतील तर त्यांना जाब विचारून जनतेला त्याबद्दल जागृत करून देशहित जपणारे एक जबाबदारीचे पद आहे.
आणि हे सर्व ज्या जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या जनतेने नेत्यांची, राजकारण्यांची भक्ती करणे सोडून खऱ्या पत्रकारितेला बळ व खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटेल व चापलूसी करणाऱ्या बनावट स्वार्थी पत्रकार व साहित्यिकांना जरब बसेल आणि सत्यपरिस्थिती जनतेसमोर येईल.
अन्यथा स्वातंत्र्य मिळूनही स्वतःच्या देशातील माणसांच्या हातातच देशाचा कारभार व स्वतःचा कष्टाचा पैसा सोपवून अदृश्य पारतंत्र्यात जीवन जगण्यात धन्यता मानणारी जमात म्हणून आपली ख्याती चिरकाल पृथ्वीतलावर टिकून राहील.
के. सतीश
Saturday, February 25, 2023
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
साम दाम दंड भेदाचे सहाय्य घेऊनी
भ्रष्ट राजकारणी ते येतील मग निवडूनी,
म्हणून स्वाभिमान मनी सगळ्यांनी जागवा
सुंदर ह्या लोकशाहीस अतिसुंदर बनवा
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ
✒ K. Satish
Tuesday, June 22, 2021
कर्तव्याची जाणीव ठेवा
आज एक संवेदनशील, सामाजिक पण दुर्दैवी विषय आपणा सर्वांसमोर मांडत आहे.
आज कायद्याचे संरक्षण असल्याने सामान्य जनता सुखाने श्वास घेऊन जगण्याचे वेडे स्वप्न बाळगून आहे. खरेतर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत बर्याच लोकांना कळतंच नाही की, हा सामान्य जनतेसाठी असलेला कायदा व कायद्याने जनतेचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले पोलिस बांधव यांना धनदांडग्यांनी पैसा, सत्ता आणि ताकदीच्या जोरावर सामान्य जनतेच्या विरूद्ध त्यांची पिळवणूक करणारे हत्यार बनवले आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे समाजातील विविध समस्या हाताळताना ज्या ज्या वेळी पोलीस खात्यातील लोकांशी संबंध आला त्या त्या वेळी पोलिसांची भूमिका ही फसवणूक अथवा छळवणूक करणार्या पैसेवाल्यांच्या बाजूनेच दिसली व सामान्य परंतु पैशाची लाच देऊ न शकणार्या अथवा लाच देण्याच्या विरूद्ध असणाऱ्या सरळमार्गी माणसांना पोलिस दमदाटी करताना दिसले. अनेकदा तर आत टाकण्याची भिती दाखवून त्यांना तक्रार मागे घेण्यास भाग पाडले जाते. आयुष्यात फक्त दोनदाच प्रामाणिकपणाने पोलिसांनी सामान्य व्यक्तीस सहकार्य करतानाचा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ते ही खात्यातील लोकांपासून दूर राहून.
माझेही अनेक मित्र पोलिस खात्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. पण पोलिस खात्याचे जे सामान्य लोकांसाठी असलेले संरक्षक कवच आहे ते इतके पोखरलेले आहे की, आज एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य नीट बजावले नाही तर त्याची तक्रार घेऊन वरिष्ठांकडे गेल्यास तिथे त्याहूनही जबर धक्का बसण्याची शक्यता असते कारण ही वाळवी वरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे माझ्या मित्रमंडळींनादेखील या समस्यांसाठी मदत मागायचे धाडस होत नाही. कारण तेदेखील याच सिस्टीमचा एक भाग आहेत.
आज मीदेखील एकेकाळी सैन्यभरतीसाठी पात्र ठरलेला युवक होतो. शेवटच्या क्षणी काही घरगुती कारणांस्तव मला तो निर्णय बदलून औद्योगिक क्षेत्रात यावे लागले. कालांतराने मला ओळखणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांनी मला MPSC करून पोलिस खाते जाॅईन करण्याचा सल्ला दिला. तुमच्या सारख्या लोकांची पोलिस खात्याला गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते. परंतु माझे ग्रॅज्युएशन पूर्ण नसून वयदेखील पुढे निघून गेल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
देशाच्या विकासासाठी, सामान्य लोकांच्या हक्कांसाठी तळमळ असलेला मी, पोलिस खाते जाॅईन करू शकलो नाही हे माझे भाग्यच समजतो. कारण पोलिसांचा जो भयानक चेहरा दिवसेंदिवस समोर येतोय तो पाहता माझी या खात्यात खूप घुसमट झाली असती आणि प्रामाणिकपणे कर्तव्य न बजावता येण्याचा मानसिक ताण वाढून मी कदाचित संपून गेलो असतो.
आज पोलिस सामान्यांना धमकावून पैसेवाल्यांचे आदेश मानत असतील, तर त्यांनी एक विचार करावा की जर सीमेवर आमच्यासोबत तुमचेही रक्षण करणारे सैन्याचे जवान यांच्या हातात आपल्या स्वातंत्र्याची व जिवाची दोरी आहे. जर दुश्मन राष्ट्रांनी त्यांना सात पिढ्या बसून खातील इतका पैसा दिला आणि तुम्हा आम्हासारख्या सर्वांवरच अन्याय करायला सांगितला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल ? जर तुम्ही त्यांच्याकडून देशभक्तीची आणि प्राण पणाला लावून देशातील सर्व जनतेचे संरक्षण करण्याची अपेक्षा बाळगता तर मग तुम्हाला वैयक्तिक स्वार्थ सोडून धनदांडग्यांपासून न्याय मिळवून देण्यासाठी सामान्य जनतेच्या बाजूने थांबण्यास काय हरकत आहे. पैसेवाल्या मस्तवाल लोकांना योग्य न्यायिक निर्णय घेण्यास भाग पाडण्यात तुमचे योगदान असूद्यात की.
प्रत्येक पोलिस हा अंगावरची वर्दी काढून ठेवल्यावर आमच्यासारखा सामान्य माणूसच असतो, त्यालाही आमच्यासारख्या प्रापंचिक अडचणी असतात. त्यावेळी माणुसकीच्या नात्याने आमच्यासारखी सामान्य जनताच तुमच्या वैयक्तिक अडचणी सोडवण्यात धडाडीने पुढे असते. मग वर्दी अंगावर आल्यावरच तुम्ही सामान्य जनतेला विसरून धनिकांच्या म्हणण्यानुसार वागायला का सुरूवात करता ?
आज सामान्य जनता कायदा व पोलिसांच्या वर्दीचा मान राखते म्हणून पोलिसांचा प्रतिकार करत नाही म्हणून पोलिसांनी वर्दीच्या आडून सामान्यांचा छळ करणे कितपत योग्य आहे ?
आज धनाढ्य शाळा प्रशासन पोलिसांचा धाक दाखवून त्याआडून पालकांना गुलामाची वागणूक देत असेल तर त्यातील पन्नास टक्के पापाचे भागीदार हे पोलिस प्रशासन आहे.
एकूण परिस्थिती पाहता देशाची वाटचाल अधोगतीकडेच जाण्याची चिन्हे आहेत.
खरंच देशभक्तीने प्रेरित होऊन पोलिस खाते जाॅईन केले असेल तर तुम्हाला आमचा सलाम... पण ती देशभक्ती तुमच्या कृतीतून दाखवून द्या. पैसा आज आहे आणि उद्या नाही. पैसेवाले पैशाच्या जोरावर तुम्हाला वापरून घेतील व विसरूनही जातील. ज्यावेळी तुम्ही पैशावर विकले जाता त्यावेळी त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. परंतु, सामान्य जनतेचा तळतळाट संपूर्ण कमावलेल्या पैशाला क्षणात मातीमोल करू शकतो.
ज्यावेळी कोरोनाच्या काळात तुम्ही तुमची ड्युटी बजावत होतात, त्यावेळी हीच सामान्य जनता तुम्हाला सलाम करत होती.
ज्यावेळी गणेशोत्सव अथवा इतर सणांच्यावेळी तुम्ही रात्रंदिवस सेवा देता तेव्हा हीच सामान्य जनता तुमचा आदर करते आणि तुमचा ताण कमी करण्याहेतूने पोलिस मित्र व स्वयंसेवकांच्या रूपाने हिरीरीने सहभागी होते. आणि अशा अनेक प्रसंगी तुमच्या कार्याला सलाम करते.
परंतु, याच सामान्य जनतेला ज्यावेळी त्यांच्या न्यायिक हक्कांसाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळी मात्र तुम्ही त्यांना कायद्याचा धाकदपटशा दाखवता. व त्यांना त्यांच्या न्यायिक हक्कांपासून वंचित राहण्याची वेळ आणता. ही तुमची कृती मनाला अतिशय वेदना देऊन जाते.
Sunday, February 28, 2021
गरज राजकीय प्लास्टिक सर्जरीची
आपल्या देशात आजतागायत चालत आलेल्या राजकारणाविषयी माझं मत काही चांगलं नाहीच. त्यामुळे मी राजकारणाचा सतत तिरस्कारच करत आलोय.
परंतु काळाच्या ओघात हे कळून चुकलंय की, राजकारणाचा तिरस्कार करून दुर्लक्षित करणारी ही बाब नाहीये. कारण राजकारणाशिवाय देश चालूच शकत नाही. देशातील समस्यांचे, जनतेच्या अडीअडचणींचे निराकरण करणे शक्य होणार नाही. आणि म्हणूनच माझे असे मत झाले आहे की, इथून पुढे जर का देशातील जनतेला सुखी ठेवून, सर्व देशात शांतता, बंधुभाव आणि समतेचे राज्य प्रस्थापित करून आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर राजकीय क्षेत्रात चांगल्या विचारांनी प्रेरित झालेल्या... तोडा, फोडा आणि राज्य करा या जुन्या राजकीय पद्धतीला फाटा देणार्या सुविचारी तरूण तरुणींनी सहभाग घ्यायला हवा.आणि अशा असंख्य तरूण- तरुणींची एक मोठी फळी तयार होणे गरजेचे आहे.
फक्त दुर्दैवाने हे नमूद करावेसे वाटते की, चांगल्या विचारांच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळावावयाचे असेल तर सध्याच्या प्रस्थापितांना तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे सुदृढ बलवान शरीर आणि पैसा यांची साथ असणे आवश्यक झाले आहे. कारण सत्ता, पैसा आणि ताकद यांच्या प्रभावाखाली दबून देशातील जनता स्वाभिमानाने जगणेच विसरून गेली आहे. व त्याचबरोबर राजकीय भक्तीला उधाण येऊन जनतेला या गोष्टीचा विसर पडलाय की, आपला भारत देश म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालवलेले राष्ट्र आहे. आणि राजकीय पुढारी हे निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येऊन देशाचा कारभार चालवणारे आणि त्याअनुषंगाने जनतेच्या सामाजिक आणि मूलभूत समस्या सोडवून त्यांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे एक जनसेवक आहेत.
आणि म्हणूनच या सर्व जनतेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण करावयाचे असेल तर आत्ताच वर सांगितल्याप्रमाणे बदल घडायला सुरूवात होणे आवश्यक आहे.
आणि हे अवघड आहे परंतु अशक्य मुळीच नाही.
वेळ आणि परिस्थितीनुसार अशक्यदेखील शक्य होते.
आत्ता जर सुरूवात झाली तर कदाचित आत्ताच्या पिढीला त्याचे पाहिजे तसे परिणाम पहावयास मिळणार नाहीत. परंतु, पुढील पिढीस मात्र नक्कीच खर्या अर्थाने आपण जनतेच्या राज्यात, खर्या लोकशाहीसंपन्न देशात राहत असल्याची अनुभूती येईल.....!!!
धन्यवाद...!!!
✒ K. Satish
Wednesday, February 3, 2021
अखंडित राहो क्रांतिकारकांचा वारसा
अन्यायकारक घटनांचा अनुभव घेत असताना बहुतांशी लोकांना वाटत असते की, आपल्यावर अन्याय होत आहे आणि त्याविरुद्ध क्रांती घडायला हवी आणि अन्यायाचा बीमोड व्हायला हवा.
परंतु या क्रांतीच्या लढ्यातील क्रांतीकारक मात्र दुसऱ्याच्या घरात जन्मलेला हवा. आणि जर हा लढा यशस्वी झाला आणि हक्कांची लढाई जिंकली तर त्या हक्कांच्या जोरावर प्रगती करणार्या आर्थिक संपन्नता लाभलेल्या व्यक्ती, उच्चशिक्षण प्राप्त झालेल्या व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, उद्योगपती, नावाजलेले कलाकार या सर्वांचा मात्र आपल्या घरी उदय व्हावा.
हा विचार बदलून सर्वजण संघटित राहिल्यास अन्याय करणारा देखील धाडस करणार नाही.
महापुरुषांचे, क्रांतिकारकांचे नुसते गुणगान गाऊन त्यांना अभिवादन करण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या. व अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा वारसा पुढे अखंड सुरू ठेवा. तेव्हाच त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही असे म्हणता येईल.
नाहीतर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची संख्यादेखील या जगात कमी नाही.
छत्रपती शिवाजीमहाराज, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहूमहाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज अशा अनेक महापुरुषांचा नुसता मुखातून जयजयकार करण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची तळमळ अंगी भिनवल्यास खर्या अर्थाने आपणास मिळालेल्या मानव जन्माचे सार्थक होईल.
✒ K. Satish
Friday, January 15, 2021
भारतीय सैन्य दिवस
हा देह तुझाच जाहला
हा प्राण तुझ्यावर वाहिला,
हे प्रिय माझ्या देशा
तु माझ्या नसानसात सामावला
मरताना पण हसतो
तो देशाचा सैनिक असतो,
देशासाठी आपुल्या तो
अविरतपणे लढत असतो
प्राण पणाला लावून देशाचे आणि सर्व देशवासियांचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिक वीर वीरांगनांना
मानाचा सलाम
✒ K. Satish
Thursday, November 26, 2020
संविधान दिन
अथक परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या संविधानाचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संविधान समितीने स्वीकारला.
हे संविधान भारताच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, सर्व नागरिकांना न्याय - समता प्रदान करण्यासाठी, देशाचे आर्थिक धोरण व्यवस्थित राबवून देशातील समस्यांचे निराकरण करून येथील जनतेला सुखाचा श्वास घेता यावा यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.परंतु , आजच्या घडीला ज्या राजकारण्यांना हा देश चालवण्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून बहुमुल्य अधिकार प्राप्त झाले आहेत, ते जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थापोटी या पवित्र ग्रंथाचा सर्रास गैरवापर करताना दिसताहेत.
आणि दुर्दैव म्हणजे ज्या जनतेच्या हक्कांसाठी या संविधानाद्वारे भारत देश हा एक लोकशाहीप्रधान देश म्हणून घोषित केला गेला, ते देखील राजकीय भक्तीच्या इतके आहारी गेलेत की, आपल्या हक्कांचा बळी देत आपलेच नेते स्वतःच्या स्वार्थापोटी आपली थट्टा करीत आहेत याचे भानच त्यांना उरले नाही.
हे संविधान जनतेचे सुजलाम - सुफलाम राष्ट्र निर्माण करण्यासाठी बनवण्यात आले होते. त्याला तोडून मोडून, आपल्या सोयीनुसार वळवून त्याची क्रूर थट्टा राज्यकर्त्यांनी चालवली आहे.
आपल्या हक्कांची जाणीव होऊन जनतेने राज्यकर्त्यांची गुलामगिरी आणि चुकीची पाठराखण करणे सोडून त्यांच्यावर अंकुश ठेवणारा दिवस उजाडेल त्याचवेळी आपल्या संविधानाचा खर्या अर्थाने सन्मान होईल...
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अडचणींचा तो विशाल डोंगर अदम्य जिद्दीने करूनी पार, शिक्षित करूनी स्त्री जातीला केला अज्ञानावरी वार स्त्री शिक्...
-
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ हे गणराया सर्वप्रथम तुला सर्व पृथ्वीवासियांतर्फे कोटी को...
-
मानवप्रजाती पृथ्वीतलावरी असे अति बलशाली हो, तरीही त्याला हतबल करीतसे नैसर्गिक कार्यप्रणाली हो प्रगतीपथावर गेलो जरी तरी ठाव न लागे निसर्गाचा,...
-
एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्च...
-
नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही ...
कर्तृत्व
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...



%20Thoughtswing.com%20title%20images_48.jpg)
Thoughtswing.com_498.jpg)



%20Thoughtswing.com%20title%20images_26.jpg)
Thoughtswing.com_427.jpg)

