नमस्कार, मुलांना घडवणे म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देणे नव्हे. बालपणी मुलांवर चांगले संस्कार घडविण्यासाठी, चांगल्या वाईटामध्ये फरक ओळखण्यासाठी, आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर येणार्या अडचणींना तोंड देण्यासाठी... योग्य मार्गदर्शन करण्याचे, योग्य रितीने मुलांना शिक्षित करण्याचे काम उत्तम गुरूवर्यांकडून वर्षानुवर्षे होत आलेले आहे.
पूर्वी शिक्षणासोबतच शरीराला सुदृढ बनविणे, बलशाली बनविणे यालाही खूप महत्त्व दिले जायचे. परंतु , आता शिक्षण म्हणजे नुसता पैशाचा बाजार झालाय. शिक्षणाच्या नावावर पालकांचे आर्थिक शोषण करून माडीवर माडी चढवीत मोठमोठ्या इमारती उभारल्या जातात. त्यात मेंढरं कोंबल्यासारखी मुले कोंबली जातात. आणि आधुनिकतेचे थोडे प्रदर्शन करून शाळांची प्रसिद्धी वाढविली जाते. आणि या सर्व गडबडीत एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत असताना आपण क्रीडांगणासाठी किती जागा ठेवली, याची जाणीव शाळा प्रशासनालाही नसते. आणि पालकांकडूनही गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे मुलांची शारिरीक वाढ होण्यासाठी योग्य मार्गदर्शन तर सोडाच पण तसे वातावरणही मिळत नाहीये.
पालकही सतत मुलांना मार्कांच्या शर्यतीत ढकलत असतात. त्या पुस्तकांच्या ओझ्यांनी तर मुलांच्या पाठीचा कणा आत्मविश्वासाने किती वर्षे ताठ राहील याची शंकाच येते.
आपल्याला देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल, महासत्तेकडे वाटचाल करावयाची असेल तर आपल्याला या नव्या पिढीचीच आवश्यकता आहे. आणि आपण त्यांना जर का नुसते पुस्तकी किडे बनवले तर ते कधीच शक्य होणार नाही. शारिरीक विकास योग्यप्रकारे झाल्यास मानसिक विकासालादेखील बळ मिळते. शरीर दुबळे झाल्यास मनाला थकवा यायलादेखील वेळ लागत नाही.
आजची परिस्थिती अशी झाली आहे की, मुलांना त्यांचे पालक नवनवीन इलेक्ट्रॉनिक गेझेट्समध्ये अडकवून ठेवण्यात पुढे आहेत. पैसा आहे म्हणून कोणत्याही अपेक्षा पूर्ण कराव्यात किंवा आधुनिकतेच्या नावाखाली मुलांना ठराविक चौकटीत अडकवून ठेवण्यासाठी पालकांनी कारणीभूत ठरणे हे त्यांच्यासाठी घातक आहेच. परंतु , देशाच्या प्रगतीलादेखील मारक आहे.
लोकसंख्या जशी वाढत आहे, नवीन जन्मदर देखील ज्याप्रमाणे वाढत आहे, त्याच्याप्रमाणानुसार मुलांना खेळण्यास क्रीडांगणासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. परंतु , दुर्दैवाने पैशाच्या लोभापायी कोणीही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
सुदृढ शरीर ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. या संपत्तीला किती चांगल्याप्रकारे जतन करून ठेवता येईल याचा विचार सर्वांनी करायला हवा.
शिक्षण हे आयुष्यात गरजेचे आहे, पैसादेखील आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु सुदृढ आणि बलवान शरीर हे या दोन्हीपेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. सुदृढ आणि बलवान शरीर असेल तर शिक्षण आणि पैसा थोडे कमी प्रमाणात असेल तरीही चालू शकते. परंतु , थकलेले, कमजोर शरीर असेल तर या दोन्ही गोष्टी कितीही जास्त प्रमाणात असल्या तरीही त्या कमीच पडू लागतात. किंबहुना त्या बर्याचदा असून नसल्यासारख्याच वाटतात.
म्हणून मुलांना शालेय शिक्षणाच्या बंधनातून थोड्या प्रमाणात शिथिलता देऊन त्यांना मैदानी खेळ, अंगमेहनतीचे खेळ खेळूद्यात. त्यांच्या इतर कलागुणांना जोपासण्यास त्यांना मदत करा. त्यांच्याबरोबर स्वतःही खेळ खेळा, गप्पा मारा.
नाहीतर बुद्धीने हुशार परंतु , शरीराने दुर्बल पिढी तयार झाल्यास आपला देश महासत्ता तर सोडाच परंतु , आपल्याला मिळालेले स्वातंत्र्यदेखील चिरकाल टिकवून ठेवण्यास आपण असमर्थ ठरू.
बघा विचार करून....
चला तर आपण सर्वच जण आत्तापासूनच यासाठी प्रयत्न करूयात...
धन्यवाद...!!!
✒ K. Satish




Thoughtswing.com_398.jpg)

