Thursday, October 9, 2025

पक्षपात - अन्यायाची बीजं

 पक्षपात करणे हा केवळ अन्याय नसून, तो समाजाच्या मूलभूत न्यायव्यवस्थेवरचा आघात आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिच्या गुणवत्तेऐवजी ओळख, नाते किंवा गटामुळे प्राधान्य दिलं जातं, तेव्हा ती फक्त एक चूक नसते तर ती एका निष्पाप, पात्र व्यक्तीच्या हक्कांवर झालेली उघड लूट असते.
   पण इथे सर्वात मोठा गुन्हेगार तो नाही जो पक्षपात करतो, तर तो आहे जो हा अन्याय सहन करतो. कारण अन्यायाला गप्प बसून सहमती देणारा प्रत्येक जण त्या अन्यायाचा भागीदार ठरतो.
   आपल्या समाजात पक्षपाती धोरणांच्या आडून काहीजण निर्लज्जपणे फायदा उपभोगतात. ते स्वतःच्या सोयीसाठी नियम बदलतात, आणि ज्यांच्याकडे आवाज नाही, त्यांच्या आयुष्यावर गदा आणतात. अशी विषमता फक्त व्यक्तीला नाही, तर संपूर्ण समाजाला कमजोर करते.
   जर आपल्याला खरंच न्यायप्रिय समाज घडवायचा असेल, तर आपल्याला दोन्ही गोष्टींचा विरोध करावा लागेल —

● पक्षपाताचा, आणि
● पक्षपाताला निमूटपणे मान्यता देणाऱ्या शांततेचा.

कारण अन्यायाविरुद्ध उभं राहणं ही केवळ गरज नाही, तर ती कर्तव्याची हाक आहे.
✒️ K. Satish






Sunday, August 10, 2025

वैचारिक दिवाळखोरी

   एखाद्या गोष्टीची सत्यता जाणून न घेता चुकीच्या ऐकीव माहितीवरून एखाद्याच्या वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आयुष्याबद्दल वाईट माहिती पसरवण्याचे पातक करणारी माणसे वैचारिक दिवाळखोर तर असतातच, परंतु त्याचबरोबर स्वतःच्या प्रगतीचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या अधोगतीची कामना करणारेदेखील असतात.
   त्यांचे हे कर्म एक दिवस फिरून त्यांच्याकडेच आल्याशिवाय राहत नाही.
   वेळ सर्वांना अनुभूती देत असते.
   त्यामुळे,
आयुष्य एकदाच मिळते, दुसऱ्याची खोटी बदनामी पसरवणे व निंदा करणे यात आयुष्य वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबियांच्या वैचारिक प्रगल्भतेकडे लक्ष दिल्यास या पृथ्वीवर जन्म मिळाल्याचे सार्थक होईल.
   अन्यथा एखाद्या कॅन्सरमध्ये आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. जो गरज नसताना निर्माण झाला व इतरांचे आयुष्य संपवत गेला....

✒️ K. Satish





Monday, August 4, 2025

शब्दांच्या शस्त्राची धार

   बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला पाहिजे. 
शब्दांच्या शस्त्राला इतकी धार असते की, त्याने केलेल्या वारांची जखम सहजासहजी भरून निघत नाही. आणि भरून निघालीच तरी ती अधूनमधून चिघळत राहतेच. 

✒️ K. Satish

 

 

 

Tuesday, February 4, 2025

खरे नाते

    काही नाती ही तुमच्या जन्माबरोबर तुमच्याशी आपसूक जोडली जातात. मग त्या व्यक्ती कशाही असल्या तरी त्यांचे संबंध तुमच्याशी जोडले जातातच.ती म्हणजे रक्ताची नाती. ही नाती निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे नसतो व अशा रक्ताच्या नात्यांविषयी समाजात असा गोड गैरसमज आहे की, ही नाती तुम्हाला कोणत्याही संकटात, बिकट परिस्थितीत साथ देतात, तुम्हाला एकटे पडू देत नाहीत, तुमच्या आनंदात आनंदी होतात व तुमच्या दुःखात त्यांनादेखील वेदना होतात.
   परंतु काळाच्या ओघात तुम्ही जसजसे पुढे मार्गक्रमण करत जाता त्यावेळी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचा समाजातील अनेक घटकांशी संपर्क येतो व त्या अनुषंगाने तुमचे अनेक मित्र, हितचिंतक, तसेच अनेक शत्रूदेखील तयार होतात. ही तुमची नवी नाती असतात जी तुम्ही स्वतः निवडलेली अथवा तुमच्या स्वभावामुळे किंवा कार्यशैलीमुळे तुमच्याशी जोडली गेलेली असतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्याचा जोडीदारदेखील नियती तुमच्यावर लादत नाही त्याचीदेखील निवड करण्याची मुभा तुम्हाला असते.
   आपल्या समाजात रक्ताच्या नात्यांना खूप महत्त्व दिले जाते. व ही नाती कधीच तुटू शकत नाहीत असा शब्दप्रयोग नेहमी वापरला जातो. परंतु अनेकदा अशा लादलेल्या नात्यांमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. कारण सध्याच्या काळात अपवादाने का होईना आपल्याला स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणारा बापही पाहायला मिळतो, पैशासाठी मुलीला देहविक्रय करायला लावणारे मातापितादेखील पाहायला मिळतात, व्यभिचारापायी स्वतःच्या मुलाचा बळी घेणारी क्रूर मातादेखील पाहायला मिळते, संपत्तीतील हिश्श्यासाठी स्वतःच्याच भावंडांचा जीव घेणारे भाऊ-बहीणदेखील पाहायला मिळतात, तसेच मुलांच्या शिक्षणाकरिता स्वतःचे अर्थकारण शून्य करून बसलेल्या व सरतेशेवटी जगण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडून देणारी मुलंही पाहायला मिळतात.
   मग प्रश्न असा पडतो की, खरंच अशा क्रूरतेमध्ये बरबटलेल्या रक्ताच्या नात्यांना इतके अनन्यसाधारण महत्त्व देऊन त्यात घुसमट होत जगणे योग्य आहे का ?, यांना खरी नाती म्हणावीत का ?
   माझ्यामते या विश्वामध्ये ज्या व्यक्तींना...प्राणिमात्रांना तुमच्या आनंदात आनंद वाटतो व तुमच्या दुःखात त्यांनादेखील मनापासून दुःख होते असे सर्वजण मग ते तुमच्या रक्ताचे असोत अथवा रक्ताचे नसोत...ते सर्व तुमचे खरे नातेवाईक समजावे. व याउलट ज्यांना तुम्हाला आनंदात पाहून वेदना होतात व तुमच्या दुःखात जे आनंदी होतात किंबहुना तुम्हाला दुःखी करण्यासाठी जे सतत कार्यरत असतात अशा सर्वांना मग ते रक्ताचे असोत अथवा नसोत, त्यांना तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर करून आपल्या सुंदर आयुष्याची आनंददायी वाटचाल सुरू ठेवावी. शेवटी या जगात आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी हे जग सोडून जायचे आहेच. मग काही चुकीच्या लादलेल्या नात्यांमुळे तुम्ही तुमचे आयुष्य का वाया घालवावे.
   आनंदाने जगा व इतरांनाही जगण्याचा आनंद घेऊ द्या... 🙏🏻

आनंदात तुमच्या ज्याला वाटे आनंद
अन् तुमच्या दुःखामध्ये हळहळे ज्याचे मन
ज्याच्यासंगे द्विगुणित होई तुमचा आनंदी क्षण
तेच तुमचे खरे नाते अन् तेच तुमचे धन

✒ K. Satish







Friday, August 23, 2024

बदल घडावा...पण सुरूवात कोठून ?

   एखादी बलात्काराची घटना घडते. नेहमीप्रमाणे दबली न जाता ती समाजमाध्यमांसमोर उघड होते आणि मग सुरू होतो जनतेचा उद्रेक...संतापाची लाट...मोर्चे...निदर्शने...फाशीची मागणी...राजकीय द्वंद्व....आणि अखेर काही दिवसांनी या सर्वांवर पडदा पडतो व सर्व शांत होतं, जोपर्यंत दुसरी एखादी अत्याचाराची हृदयद्रावक घटना उघडकीस येत नाही तोवर.
   अशा घटनांनी खरंच काळीज पिळवटून जाते. परंतु, नीट विचार केलाय का की, या घटना का घडतात व कोण करतं ते. कदाचित आज अशा घटनांवर हळहळ व्यक्त करणारा किंवा आंदोलन करणाराच एखाद दिवशी व्यसनाच्या धुंदीत अथवा अश्लील साहित्याच्या आहारी गेल्याने वासनांध होऊन स्वतःदेखील अशा घटनेस कारणीभूत ठरू शकतो.
   हे सर्व आंदोलन, मोर्चा किंवा एखाद्या केसमध्ये शिक्षा करून थांबणार नाही. यासाठी सर्वांना आपले विचार शुद्ध करणे आवश्यक आहे आणि शुद्ध विचारांप्रमाणेच आपले आचरण ठेवणे गरजेचे आहे. सर्व तरुणांनी, आबालवृद्धांनी महापुरूषांचे पौरूषत्व समजून घेणे गरजेचे आहे. हे पौरूषत्व स्त्रीवर लैंगिक अत्याचार करण्यात नसून दुर्बल व पीडितांचे रक्षण करण्यात असते.
   आज प्रत्येकाने चांगले साहित्य वाचले, अश्लील साहित्य...अश्लील सिनेमे...अश्लील वेबसिरीज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवले, कोणतीही स्त्री समोर आल्यास तिच्याविषयीची आपली दृष्टी साफ ठेवली तरच अशा घटनांना आळा घालता येईल.
   यासाठी प्रत्येक पुरूषाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे गरजेचे आहे. कारण ज्याच्याकडून हा घृणास्पद अपराध घडतो त्यालाही आई, बहीण बहीण, बायको, मुलगी यापैकी कोणतेतरी नातेसंबंध असतातच ना ? आज एखाद्या दुसर्‍या स्त्रीसोबत त्याच्याहातून जे घाणेरडे पाप घडेल तेच पाप कदाचित दुसरा नीच वृत्तीचा व्यक्ती त्याच्याही कुटुंबियांसमवेत करू शकतो याचा विचार करण्याची वैचारिक पातळी प्रत्येकामध्ये यायला हवीय.
   प्रत्येकाने स्वतःला सुमार्गावर नेण्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल केले तरच अशा घटना घडण्याला आळा बसेल. अन्यथा कितीही आंदोलने, उद्रेक, चिडचिड केली तरीही काही दिवसांनी पुन्हा दुसरी घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि तीदेखील लोकांसमोर उघड होईलच असे नाही.
   त्यामुळे अशा घटनांनी ज्या ज्या पुरूषांच्या हृदयाला तीव्र वेदना होत असतील त्या सर्वांनी स्वतःचे आचरण व विचार शुद्ध करून स्वतःला व्यभिचारापासून अलिप्त ठेवण्यासाठी सक्षम बनवल्यास खर्‍या अर्थाने समाज सुधारण्यास मदत होईल. नाहीतर स्वतःचे विचार अशुद्ध ठेवून इतर घटनांमध्ये भावनांचा उद्रेक दाखवणे हा दुटप्पीपणाच ठरेल...नाही का ?
   पहा पटतंय का ?
✒ K. Satish





Tuesday, April 23, 2024

सत्यवचन

    कर्तृत्वशून्य, अकार्यक्षम नेत्याला त्याच्या चुकीच्या कार्यपद्धतीविषयी आरसा दाखवणार्‍या प्रामाणिक सर्वसामान्य व्यक्तींची आपल्या चमच्यांकरवी वैयक्तिक पातळीवर खोटी बदनामी करून त्या व्यक्तींची जनसामान्यातील प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचणारा नेता व त्याचे चमचे हे षंढांहूनही खालच्या पातळीवर गणना केली जाण्यास पात्र ठरतात.
   कारण प्रामाणिकपणे लढण्यासाठी त्यांच्याकडे नैतिक मूल्यांचा ठेवा तर नसतोच परंतु वैचारिक पातळीवर सामना करण्याची धमकदेखील नसते.
   हे लोक पृथ्वीतलावरील मानवतेला पोखरणाऱ्या कीडेप्रमाणे असतात. एक दिवस सामान्य जनतेला यांचे खरे रूप कळल्याशिवाय रहात नाही.
✒ K. Satish



Saturday, April 6, 2024

नाकर्त्या नेत्यांचे कसब

   नाकर्त्या नेत्यांची एक खासियत असते. ते जनतेचे भले करण्याऐवजी पद्धतशीरपणे उघड उघड जनतेचे नुकसान करूनदेखील पुन्हा हे नुकसान जनतेतीलच काही लोकांच्या चुकीमुळे कसे झाले आहे, हे पटवून देणाऱ्या वावड्या त्यांच्या स्वाभिमान विकलेल्या हस्तकांमार्फत समाजात अशाप्रकारे पसरवतात की, लोक या नेत्यांच्या चुकीच्या कृतीविरूद्ध आवाज उठवण्याऐवजी आपल्याच लोकांशी वाद घालत बसतात व या नेत्यांचे बिंग फोडणाऱ्या काही जागरूक लोकांवरच या नुकसानीचे खापर फोडून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात. आणि मग चमचे मंडळींना काही अल्पशा आमिषाचा तुकडा टाकून हे नाकर्ते नेते आपण केलेल्या भ्रष्ट कारस्थानाच्या मलईचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्ततेचा ढेकर देतानाच त्यांच्या चमच्यांसहित सर्व जनतेच्या अज्ञानी मूर्खपणाची मजा घेत नवीन कारस्थानासाठी प्रस्थान करतात.


   जनता नकळतपणे आपल्याच पुढील नुकसानाकरिता या नेत्यांना अदृश्यपणे बळ देत असते. कारण, जनतेतील जागरूक लोकांच्या कडवट वृत्तीपेक्षा या नेत्यांची आणि त्यांच्या चमच्यांची कपटी मधुर वाणी जनतेला भ्रमित करीत असते.
✒ K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...